पुणे : न्यूज कट्टा
पुण्यातील बाजीराव रोडवर काल दुपारी तिघांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तिघांना अटक केलं आहे. पुण्यात नव्याने उदयास येणाऱ्या टोळीनं पूर्ववैमनस्यातून मयांक खराडे याचा निर्घृणपणे खून केल्याची बाब तपासात समोर आली आहे. दरम्यान, आरोपींनी मयांकची हत्या करताना त्याच्या हाताचे बोट कापत केसही कोयत्याने छाटले होते. त्यामुळं क्रूरपणे ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
मयांक खराडे हा आपल्या अभिजीत इंगळे नावाच्या मित्रासोबत बाजीराव रोडवरून जात असताना अचानकपणे मास्क लावलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. कोयता आणि कुकरीच्या सहाय्याने या दोघांवरही वार करण्यात आले. त्यामध्ये मयांक खराडे याचा जागीच मृत्यू झाला. तर अभिजीत इंगळे हा जखमी झाला आहे. आरोपींनी मयांक खराडेचे केस कोयत्यानं कापले. त्यानंतर त्याचं बोटही कापलं होतं. तुटलेलं बोट रस्त्यावर पडलं होतं.
अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून पुण्यातील गुन्हेगारीवर पोलिसांचे नियंत्रण राहिले नसल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पुणे शहरात नव्याने उदयाला येत असलेल्या ‘माया’ टोळीने ही हत्या घडवून आणल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानुसार पोलिसांनी या टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेतले आहे.





