पुणे : न्यूज कट्टा
अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणल्याची घटना पुण्यातील कर्वेनगर परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा चोरीचा प्रकार असल्याचा बनाव रचण्यात आल्याचंही पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान, पत्नी आणि तीन मुलींसमोरच ही हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात श्रीमान सोसायटीत मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल हे एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. काल मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा अज्ञातांनी वाजवला.
निवंगुणे यांनी दार उघडताच समोरून आलेल्या हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राहुल यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी त्यांची पत्नी आणि तीन मुली बाहेर आल्या. हल्लेखोरांनी घरातील दागिने, रोख रक्कम आणि किंमती वस्तुही चोरून नेल्या. आपल्या डोळ्यांसमोर वडिलांची हत्या झाल्यानं तीनही मुलींना जबर धक्का बसला. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली.
यामध्ये संबंधित हल्लेखोर हे तोंडाला कापड बांधून आल्याचं मुलींनी सांगितलं. त्यानंतर राहुल यांच्या पत्नीकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना घातपाताचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी मृत राहुल यांच्या पत्नीला बोलतं केलं. त्यावेळी तिने प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. आपल्या अनैतिक संबंधांबद्दल पतीला माहिती मिळाली होती. यामध्ये तो अडथळा निर्माण करत होता. त्यामुळं आपण ही हत्या घडवून आल्याची कबुली तिने दिली आहे.
चोरीचा रचला बनाव
या हत्येनंतर पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी राहुल यांच्यावर वार केल्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर या आरोपींनी घरातील दागिने, रोख रक्कम चोरून नेल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. मात्र पोलिसांना पत्नीवर संशय आला आणि चोरीचा बनाव रचला जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अनैतिक संबंधातून ही हत्या घडवल्याचं समोर आलं आहे.





