पुणे : न्यूज कट्टा
अलिकडील काळात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अशातच पुण्यात एका अल्पवयीन मुलानं मौजमजा करण्यासाठी पैसे मिळावेत यासाठी एका युवतीच्या सांगण्यावरून स्वत:च्याच घरातील दागिन्याची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलासह २४ वर्षीय युवतीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एका १५ वर्षीय मुलाची २४ वर्षीय युवतीबरोबर ओळख होती. त्यानंतर दोघांमध्येही चांगली मैत्री झाली. या दोघांना मौजमजा करण्याची हौस होती. मात्र त्यासाठी पैशांची कमतरता भासत होती. त्यामुळं या तरुणीने अल्पवयीन मुलाला घरातच चोरी करण्यास भाग पाडलं.
या अल्पवयीन मुलानं घरातील कपाटातून स्वत:च्या आईची १ लाख ४० हजार रुपये किमतीची साडेतीन तोळे वजनाची मोहनमाळ चोरून या युवतीला आणून दिली. त्यानंतर युवतीने तिच्या दुसऱ्या मित्राला या मुलाची आई आजारी असल्यामुळे ही मोहनमाळ विकून पैसे आणून देण्यास सांगितलं. त्यातून आलेले पैसे या युवतीसह अल्पवयीन मुलाने स्वत:कडे ठेवून घेतले.
या दोघांना मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी संबंधित युवतीने अल्पवयीन मुलाला घरात चोरी करायला भाग पाडले. त्यातून आलेल्या पैशातून हौस भागवण्याचा या दोघांचा प्लॅन होता. याबाबत अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित युवतीसह अल्पवयीन मुलावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम करत आहेत.





