पुणे : न्यूज कट्टा
राज्यात महिला अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतानाच पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका महिलेने गुंगीचे औषध पाजून पुरुषावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. वकील असलेल्या महिलेनं संबंधित पुरुषाचे अश्लील फोटो दाखवून त्याला ब्लॅकमेल केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उघड झाल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
गौरी प्रल्हाद वांजळे असं या महिलेचं नाव असून ती वकिल असल्याचं सांगते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या फिर्यादीची गौरी वांजळे हिच्याशी ओळख झाल्यानंतर तिनं आपण वकील असल्याचं सांगितलं होतं. आपल्या मोठमोठ्या लोकांशी ओळखी असल्याचं तिनं सांगितलं होतं. त्यानंतर ही महिला संबंधित पुरुषाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील घरी ये-जा करत असे.
या दरम्यान, गौरीने आपल्याला धार्मिक स्थळी जायचं असल्याचं सांगून फिर्यादीला बोलावून घेतले. त्यावेळी त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीला बळजबरीने वाराणसी येथे नेऊन त्याच्यावर अत्याचार केले. फिर्यादीला गुंगीचं औषध देऊन ती वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करत होती. याचदरम्यान, तिनं फिर्यादीला त्याचे अश्लील फोटो दाखवून पैशांची मागणी केली. तुझे सगळे फोटो व्हायरल करेन अशी धमकी ती देत होती.
या महिलेने आरोपीवर लग्नासाठीही तगादा लावला होता. पैसे दे नाहीतर माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझं काही खरं नाही असं सांगत ती सतत धमकावत होती. त्यामुळं फिर्यादीने या प्रकरणाची पोलिस तक्रार दाखल केली. त्यानुसार गौरी वांजळे हिच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील एका महिलेनं पुरुषाबरोबर केलेल्या या कृत्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.





