PUNE GANGWAR : पुण्यात पुन्हा एकदा गॅंगवार; आधी गोळ्या झाडल्या मग कोयत्याने वार, आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या

पुणे : न्यूज कट्टा

पुण्यात पुन्हा एकदा गॅंगवारने डोकं वर काढलं आहे. वनराज आंदेकरच्या खूनातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात गायकवाड टोळीतील गँगस्टर समीर काळेचा भाऊ गणेश काळे याचा गेम करण्यात आला आहे. कोंढवा येथील खडी मशीन चौकात एका पाठोपाठ सहा गोळ्या झाडत आणि कोयत्याने वार करत गणेश काळे याची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोंढवा येथील खडी मशीन चौकात आज दुपारी ही घटना घडली आहे.  गणेश काळे हा रिक्षामध्ये बसलेल्या असताना दोन दुचाकीवरून आलेल्या चार तरुणांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी गणेशवर कोयत्याने वार करत घटनास्थळावरून पोबारा केला. गणेश काळे हा रिक्षाचालक होता. त्याच्यावर एक गुन्हाही दाखल होता, अशी माहिती आता समोर आली आहे. ही हत्या आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गणेश काळे हा गायकवाड टोळीतील कुख्यात गुंड समिर काळे याचा धाकटा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणांमध्ये समीर काळे याने बंदूक पुरवली असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.

१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून झाला होता. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर यांच्यासह तब्बल २१ आरोपींना अटक करण्यात आली होती. वनराजच्या हत्येनंतर आंदेकर टोळीने अंत्यसंस्कारादरम्यान बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्यानुसार १ सप्टेंबर २०२५ रोजी प्लॅनही आखून संबंधित आरोपींची रेकी करण्यात आली होती. मात्र पोलिसांना याची कुणकुण लागल्याने हा प्लॅन फेल गेला होता.

दरम्यानच्या काळात, गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर आणि त्यांच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली होती. सद्यस्थितीत आंदेकर आणि कोमकर कुटुंबीय तुरुंगात आहे. अशात आज समीर काळेच्या भावाची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!