बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाची धुरा स्वत:कडे घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पुणे आणि बारामती दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध संस्थांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठका घेतल्या. अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादीतून उमेदवारांची निवड केली होती. त्यामुळे आपण कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द सुनेत्रा पवार यांनी दिला आहे.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यात नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. त्यानंतर काल शनिवारी त्यांनी बारामतीत मॅरेथॉन बैठका घेत आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. बारामतीतील विविध सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत त्यांनी अजितदादांच्या शिस्तबद्ध कामाचे स्मरण ठेवत संस्थांचा कारभार करण्याच्या सूचना दिल्या. दादांप्रमाणेच सर्व संस्थांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
दुपारच्या सत्रात त्यांनी सहयोग भवन येथे बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधला. या दरम्यान, विलीनीकरण व्हायचंय तेव्हा होईल. परंतु जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित काम करावं अशी मागणी काही प्रमुखांनी केली. त्यावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी अजितदादांनी भविष्याचा विचार करून दोन्ही पक्षांना एकत्र आणत या निवडणुकीत उमेदवार दिले होते. त्यामुळे आपण कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला.
अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली आहे. स्वत:वर दु:खाचा डोंगर कोसलेला असतानाही त्या पक्षातील कार्यकर्त्यांना आधार देत आहेत. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनिमित्त एकत्र आलेल्या दोन्ही पक्षातील सदस्य आणि कार्यकर्त्यांना कायम तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली आहे.





