नीरा : न्यूज कट्टा
दवाखान्यातून घरी निघालेल्या बापलेकाला नीरा शहरात अडवून मारहाण करत दुचाकी पेटवून देणाऱ्या आरोपीला जेजूरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. शुक्रवारी रात्री दहशत माजवत पोबारा करण्याच्या प्रयत्नात हा आरोपी होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करत या आरोपीला अटक केली आहे.
अक्षय शेवाळे (रा. नीरा, ता. पुरंदर) असं या आरोपीचं नाव आहे. सचिन कोरडे (रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, सचिन कोरडे हे आपल्या वडिलांना उपचारासाठी सातारा जिल्ह्यातील सेंद्रे येथे घेऊन गेले होते. काल रात्री ते आपल्या वडिलांना एका ट्रकमध्ये बसवून स्वत: दुचाकीवरून घरी जात होते. नीरा शहरातील पालखी तळाजवळ आल्यानंतर सचिन यांनी आपल्या वडिलांना ट्रकमधून खाली उतरवले.

या दरम्यान, त्या ठिकाणी आलेल्या अक्षय शेवाळे याने सचिन कोरडे यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच मिरचीची पूड डोळ्यात टाकत हातातील कड्याने डोक्यात मारहाण केली. त्यामुळे सचिन यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. भयभीत झालेल्या सचिन यांनी आपली दुचाकी तिथेच सोडून पळ काढला. त्यावेळी अक्षय शेवाळेने कोरडे यांच्या वडीलांनाही मारहाण करत कोरडे यांची दुचाकी घेऊन जेजूरीकडे निघून गेला. त्यानंतर त्याने नीरा शहरातील शिवाजी चौकामध्ये ही दुचाकी जाळून टाकली. या प्रकरणी सचिन कोरडे यांच्या फिर्यादीनंतर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अक्षय शेवाळे हा पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले आहे. जेजूरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. बी. वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, नीरा पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार संतोष मदने, पोलिस नाईक हरिश्चंद्र करे यांनी ही कामगिरी केली.





