सासवड : न्यूज कट्टा
पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. ते येत्या दोन दिवसात दि. १६ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी आज सासवडमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संवाद साधत भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून पुणे जिल्ह्यातून काँग्रेस पूर्णत: हद्दपार झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
विधानसभा निवडणुकीत संजय जगताप यांचा विजय शिवतारे यांनी पराभव केला होता. त्यानंतर संजय जगताप हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. अशातच भोरचे माजी आमदार आणि एकेकाळचे काँग्रेस निष्ठावंत संग्राम थोपटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय जगताप हे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. आज संजय जगताप यांनी सासवड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजप प्रवेश करण्याची घोषणा केली.
संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ईमेल करत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी सासवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली. आघाडी म्हणून आम्हाला नेहमीच नुकसान सोसावे लागले असून आता काँग्रेसलाही संघटनात्मक शिस्त लागणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रवेश करताना आपला वैयक्तिक स्वार्थ नसून केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सत्तेसोबत जाणार असल्याचं सांगितलं आहे.
संजय जगताप हे बुधवार दि. १६ जुलै रोजी सकाळी १० वाजताभाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सासवडमधील पालखी तळावर होणाऱ्या पक्ष प्रवेश सोहळ्याला भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, संजय जगताप यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी त्यांचा भाजप प्रवेश हा पुणे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करणारा ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर आता मोठी नामुष्की ओढवणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.





