नीरा : न्यूज कट्टा
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील अभिजीत ज्वेलर्स या सराफी पेढीवर दरोडा पडला आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास दुकानाचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने तोडून २० किलो चांदीचे दागिने लांबवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी नीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर नीरा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नीरा ही पुरंदर तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजली जाते. काल सायंकाळी अभिजीत ज्वेलर्सचे मालक विजयकूमार मैढ हे आपली सराफी पेढी बंद करून घरी गेले होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले त्यावेळी त्यांना दुकानाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. दुकानात प्रवेश केल्यानंतर चांदी व सोन्याच्या दागिन्यांचे रॅक अस्ताव्यस्त पडल्याचं पाहायला मिळालं.
त्यांनी तातडीने ही बाब नीरा पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकाराची माहिती घेतली. या घटनेत जवळपास २० किलो चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. सोन्याचे दागिने ठेवलेली तिजोरी खोलता न आल्यामुळे हे दागिने सुरक्षित राहिले आहेत. दरम्यान, या चोरट्यांनी या दुकानातील सीसीटीव्ही व संबंधित उपकरणांचीही चोरी केल्याचं तसेच दुकानाशेजारी असलेल्या सीसीटीव्हींचीही तोडफोड केली असल्याचं समोर आलं आहे.





