बारामती : न्यूज कट्टा
धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे सातत्याने धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आज सायंकाळी ७ वाजता हा विसर्ग वाढवत ४७ हजार ३५० क्युसेस इतका करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असून नीरा खोऱ्यातील नीरा देवधर, भाटघर आणि गुंजवणी ही तीनही धरणातील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे या धरणांमधून वीर धरणात मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वीर धरणातून नीरा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज दुपारी ४ वाजता वीर धरणातून ३३ हजार ५०० क्युसेसने विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यात सायंकाळी ७ वाजल्यापासून वाढ करण्यात आली आहे.
सायंकाळी ७ वाजता वीर धरणातून ४७ हजार ३५० क्युसेस एवढा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नदीकाठच्या लोकांनी अधिकची दक्षता घेऊन नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नीरा नदीतील विसर्गात अधिकची वाढ होणार आहे.





