बारामती : न्यूज कट्टा
महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून काम केलेले आणि सध्या महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी कार्यरत असलेले सुनील रंगनाथ पावडे (वय ५४) यांचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. जळगाव येथे लग्न समारंभासाठी गेलेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. दरम्यान, कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या पावडे यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे.
सुनील पावडे हे जळगाव येथे एका लग्न समारंभासाठी सहकुटुंब गेलेले होते. त्यावेळी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून सुनील पावडे यांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांची महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी बढती झाली होती. त्यामुळे ते सध्या पुण्यात कार्यरत होते.
तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात १९९१ साली कनिष्ठ अभियंता या पदापासून सुनिल पावडे यांनी वीज क्षेत्रातील सेवेला सुरुवात केली. २००६ साली सरळसेवा भरतीतून ते कार्यकारी अभियंता झाले. नोव्हेंबर २०१५ मध्ये अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी पुणे ग्रामीण व नाशिक शहर मंडलात काम केले. तर २०१८ मध्ये सरळसेवेतून मुख्य अभियंता म्हणून त्यांनी बारामती परिमंडलात काम केले. मुख्य अभियंता म्हणून काम करत असताना त्यांनी महाराष्ट्राला ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम दिला. दैनंदिन कामातही त्यांनी स्वत:ची छाप कायम सोडली. बारामती परिमंडल कायम अग्रेसर राहील याची काळजी घेतली.
पावडे यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरीकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. पावडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. पावडे कुटुंबाला या दु;खातून सावरण्याची शक्ती मिळो असंही त्यांनी आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात नमूद केलं आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी या त्यांच्या मूळ गावी बुधवारी (दि. ४) सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.





