भोर : न्यूज कट्टा
भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॉँग्रेसपासून दूर होताना दु:ख होत आहे. मात्र पक्षानेच ही वेळ आणल्याचं सांगत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मंगळवारी दि. २२ एप्रिल रोजी मुंबईमध्ये थोपटे यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संग्राम थोपटे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये बदल करत कॉँग्रेसचं चिन्ह हटवलं होतं. त्यानंतर आज त्यांनी भोरमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा या मेळाव्यात केली.
कॉँग्रेस पक्षात आजवर प्रामाणिकपणे काम केलं. मिळेल ती जबाबदारी पार पाडली. मात्र पक्षाकडून वेळोवेळी डावलण्यात आल्याची खंत संग्राम थोपटे यांनी व्यक्त केली. पक्ष सोडताना दु:ख होत असले तरी पक्षानेच ही वेळ आणल्याचंही त्यांनी नमूद केलं. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजपमध्ये जाण्याची भूमिका घेतल्याचं संग्राम थोपटे यांनी सांगितलं.
मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजप कार्यालयातच हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. दरम्यान, संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश हा कॉँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.





