SATARA CRIME : जन्मदात्या आईने प्रियकराच्या मदतीने रचला खूनाचा कट;नशीब बलवत्तर म्हणून मुलगा वाचला आणि आईसह चौघांना पडल्या बेड्या

कराड : न्यूज कट्टा

अनैतिक संबंधात ठरणारा अडसर आणि व्यसनाधीनता यामुळं जन्मदात्या आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या तरुण मुलाच्या खुनाचा कट रचल्याचा प्रकार कराड तालुक्यातील वराडे येथे घडला आहे. विशेष म्हणजे प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाचा खून करण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला आहे. या प्रकरणी तळबीड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

शोभा महादेव शेंडगे (वय ३८, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली, जि. पुणे), जयेंद्र गोरख जावळे (वय ४०, रा. सांगवी, ता. हवेली. जि. पुणे), सिद्धार्थ विलास वाव्हळे (२५, रा. मातोश्रीनगर, वांगी रोड, परभणी), अकबर मेहबूब शेख (२५, रा. निकाळजे वस्ती, बाणेरगाव, बालेवाडी स्टेडियमजवळ, ता. हवेली) या चौघांना अटक करण्यात आली आहे. प्रशांत महादेव शेंडगे (वय २४, रा. शिवडे, ता. कराड) हा या घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील वराडे हद्दीत एका सागवानाच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेंडगे हा युवक जखमी स्थितीत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, अशोक भापकर, रवींद्र भोरे, अमित बाबर, रोहित पारनेर, सत्यवान पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

पोलिस तपासात प्रशांतच्या आईचे अनैतिक संबंध असल्याचं आणि त्याला प्रशांतचा विरोध असल्याचं निष्पन्न झालं. प्रशांत हा अनैतिक संबंधांवरून आईशी वाद घालत होता आणि त्याला दारुचेही व्यसन लागले होते. त्यातूनच त्याची आई शोभा हिने आपला प्रियकर जयेंद्र जावळे याला सांगून प्रशांतच्या खूनाचा कट रचला.  जयेंद्र जावळे याने सिद्धार्थ व्हावळे आणि अकबर शेख या दोन साथीदारांना सोबत घेऊन प्रशांतला उंब्रज येथून वराडे येथील शेतात आणले.

त्या ठिकाणी प्रशांतला दारू पाजण्यात आली. त्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. प्रशांतला जखमी अवस्थेतून सोडून हे सर्वजण घटनास्थळावरून फरार झाले. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करत या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास तळबीड पोलिस करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!