पुणे : न्यूज कट्टा
भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येत पत्नीचाच सहभाग असल्याचं उघड झाल्यानंतर आता अनेक गोष्टी समोर येवू लागल्या आहेत. सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याचवेळी केवळ हातपाय तोडण्याची सुपारी दिल्याची कबुली मोहिनी वाघ हिने पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान, सतीश वाघ यांचे भाचे योगेश टिळेकर हे आमदार आहेत ही बाब समजल्यानंतर हल्लेखोरांनी सतीश वाघ यांची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक बाबही आता स्पष्ट झाली आहे.
उद्योजक सतीश वाघ हे दि. ९ डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी ब्ल्यू बेरी हॉटेलजवळ चारचाकीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं होतं. दरम्यान, ९ डिसेंबर रोजी रात्रीच सतीश वाघ यांचा मृतदेह मिळून आला होता. त्यामध्ये वाघ यांच्यावर ७२ वेळा वार करत त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं होतं. तसेच सतीश वाघ यांचे गुप्तांगही कापण्यात आलं होतं.
या प्रकरणी पोलिसांनी मोहिनी वाघ हिच्यासह पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. गणेश नगर, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८, रा. बजरंगनगर, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय ३२, रा. विघ्नहर्ता सोसायटी, फुरसुंगी फाटा) यांना अटक केली आहे.
सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनेच ही हत्या घडवून आणल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. मोहिनी वाघ हिने संपत्तीचा ताबा मिळवण्यासाठी आणि अनैतिक संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी ही हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. दुसरीकडे सतीश वाघ यांचेही अनैतिक संबंध होते असंही तपासात समोर आलं आहे. त्याचवेळी या हल्लेखोरांना केवळ हातपाय तोडण्याची सुपारी दिल्याची कबुली मोहिनी वाघ हिने दिली आहे. मात्र हल्लेखोरांना सतीश वाघ यांचे भाचे योगेश टीळेकर हे आमदार आहेत असं समजल्यानंतर त्यांनी वाघ यांची हत्या केल्याचेही तपासात समोर आले आहे.





