शिरूर : न्यूज कट्टा
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची काल दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याची माहितीही आता समोर आली आहे.
पप्पु नामदेव गिलबिले असं या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. काल रविवारी दुपारी ही घटना घडली होती. याबाबत दत्तात्रय गिलबिले यांच्या पत्नी रोहिणी दत्तात्रय गिलबिले (रा. हिवरे रोड, कोयाळी गावठाण, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत दत्तात्रय गिलबिले यांच्या घराशेजारीच पप्पू गिलबिले हा वास्तव्यास आहे. पप्पू गिलबिले याला दत्तात्रय गिलबिले हे आपल्या पत्नीशी चॅटिंग करत असल्याचा संशय होता. त्यातून पप्पू गिलबिले याचा वर्षभरापूर्वी दत्तात्रय गिलबिले यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतर सातत्याने या दोघांमध्ये खटके उडत होते. रविवारी दुपारच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे आपल्या घरासमोर बसलेले असताना पप्पू गिलबिले याने त्यांच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर धारदार शस्त्राने वार केले आणि तो पसार झाला.
या घटनेनंतर आरडाओरडा ऐकून मयत दत्तात्रय यांच्या पत्नी घराबाहेर आल्या. त्यावेळी त्यांना दत्तात्रय गिलबिले हे जखमी अवस्थेत आढळून आले. पप्पू गिलबिले यांनी आपल्यावर वार केल्याचं दत्तात्रय गिलबिले यांनी पत्नीला सांगितलं. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दत्तात्रय गिलबिले यांना जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलवण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच दत्तात्रय गिलबिले यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
दरम्यान, या घटनेनंतर पप्पू गिलबिले हा फरार झाला होता. मात्र शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत आरोपीच्या शोधाला सुरुवात केली होती. अवघ्या बारा तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.





