SHIRUR CRIME : नातेवाईकांच्या लग्नाला यायला पत्नीचा नकार; पतीनं थेट हातपाय बांधून तिचा गळा घोटला..!

शिरूर : न्यूज कट्टा

नातेवाईकांच्या लग्नाला येण्यास नकार देणाऱ्या पत्नीचे हातपाय बांधून तिचा गळा दाबून कहू केल्याची खळबळजनक घटना शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा हद्दीत घडली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

मीनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय २७) असं या घटनेत मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी ताराचंद सुखलाल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दड पिंपरी येथील गांगुर्डे दांपत्य शेतीच्या कामासाठी शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे सुभाष बाबू काळे यांच्या शेतात वास्तव्यास होते.

ज्ञानेश्वर गांगुर्डे याच्या एका नातेवाईकाच्या घरी विवाह सोहळा होता. या लग्नाला जाण्यासाठी त्याची पत्नी मीनाबाई हिने नकार दिला होता. त्यातूनच मंगळवारी सायंकाळी या दोघा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे ज्ञानेश्वर गांगुर्डे याने आपल्या पत्नीचे हातपाय बांधून तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर ज्ञानेश्वर गांगुर्डे हा पहाटेच्या सुमारास घरातून निघून गेला.

सकाळी मीनाबाई घराबाहेर येत नसल्यानं शेजारीच राहणारे त्यांचे बंधू ताराचंद मोरे हे तिच्या घराजवळ गेले. त्यावेळी मीनाबाई हिचा मृतदेह हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक अनिल चव्हाण, शिवाजी मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर ज्ञानेश्वर गांगुर्डे हा फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!