शिरवळ : न्यूज कट्टा
जुन्या वादातून एकाने कंपनीत सोबत करणाऱ्या सहकारी युवकाचा तलवारीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना शिरवळ एमआयडीसीत घडली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपी रक्ताने माखलेल्या तलवारीसह शिरवळ पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेनंतर शिरवळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर (वय २२, रा. वडवाडी, ता. खंडाळा) असं या घटनेत मृत पावलेल्या युवकाचं नाव आहे. या हत्येप्रकरणी तेजस महेंद्र निगडे (वय १९,रा. गुणंद, ता.भोर, जि.पुणे) याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमर आणि तेजस हे दोघेही शिरवळ येथील एका कंपनीत नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता.
बुधवारी रात्री तेजस कंपनीच्या बाहेर अमर येण्याची वाट पाहत थांबला होता. त्यानं सोबत एका पोत्यात तलवार लपवून ठेवली होती. दरम्यानच्या काळात अमर आणि त्याचा एक मित्र दुचाकीवरून बाहेर आले. त्यावेळी तेजसने या दोघांना अडवत अमरच्या कानशीलात लगावली. या दोघांचा वाद पाहून अमरसोबत असलेला मित्र त्या ठिकाणाहून पळून गेला. त्यानंतर तेजसने त्याच्याकडील तलवारीने अमरच्या डोक्यात, हातावर व पायावर सपासप वार केले. त्यामध्ये अमर कोंढाळकरचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर तेजस एका दुचाकीस्वाराची लिफ्ट घेऊन घटनास्थळावरून थेट शिरवळ पोलिस ठाण्यात गेला. त्या ठिकाणी रक्ताने माखलेली तलवार घेऊन आपण खून केल्याचं सांगत आत्मसमर्पण केलं. शिरवळ पोलिसांनी तेजसवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. दरम्यान, या घटनेनंतर अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.वैशाली कडुकर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिरवळचे पोलीस निरीक्षक संदिप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे यांनी घटनास्थळी भेट दिली. शिरवळ पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.





