राजगुरूनगर : न्यूज कट्टा
दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून दहावीत शिकणाऱ्या सहकारी विद्यार्थ्याचा खासगी शिकवणीचा वर्ग सुरू असतानाच धारदार शस्त्राने वार करत निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे घडली आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांमधील वाढत्या गुन्हेगारीचा विषय या निमित्तानं ऐरणीवर आला आहे.
पुष्कर दिलीप शिंगाडे (वय १६, रा. वाडा रोड, राजगुरुनगर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजगुरुनगर येथील पाण्याच्या टाकीनजीक एका इमारतीत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेतली जाते. याच शिकवणीत मयत पुष्करही जात होता. दोन-तीन महिन्यांपूर्वी पुष्कर आणि इतर मुलांचा वाद झाला होता. त्यानंतर संबंधित संशयित विद्यार्थी शिकवणीला फारसा उपस्थित राहत नव्हता.
दरम्यानच्या काळात शनिवारी दि. १३ डिसेंबर रोजी पुष्कर आणि संबंधित विद्यार्थ्याचा पुन्हा वाद झाला. त्यावेळी हा वाद मिटवला गेला. मात्र सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा संशयित विद्यार्थी तळमजल्यावर असलेल्या शिकवणीच्या वर्गात आला. सकाळी ९ वाजता शिकवणीचा वर्ग संपल्यानं सगळे परत निघालेले असतानाच त्याने पुष्करच्या पोटावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार केले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरड केली. त्यामुळं शिक्षकही घाबरून गेले.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पुष्करला शिकवणीच्या वर्गातून बाहेर आणून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच पुष्करचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेनंतर संबंधित संशयित अल्पवयीन आरोपी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, खेडचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली.
दरम्यान, पुष्करचा शिकवणी वर्गात झालेल्या वादाची कुटुंबीयांना कल्पना नव्हती. त्याला पूर्वी झालेल्या मारहाणीबद्दलही त्यांनी घरात सांगितलं नव्हतं. एवढं सगळं घडत असताना शिकवणी घेणारे शिक्षक काय करत होते असा उद्विग्न सवाल पुष्करच्या नातेवाईकांनी उपस्थित करत संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर शिंगाडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.





