SHOCKING : रात्री कुटुंबियांसोबत जेवण अन् काहीच वेळात स्वत:वर गोळी झाडली; लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर : न्यूज कट्टा  

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली असून मनोहरे यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर लातूरसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शनिवारी दि. ५ एप्रिल रोजी रात्री बाबासाहेब मनोहरे यांनी शासकीय निवासस्थानी कुटुंबीयांसोबत जेवण केलं. त्यानंतर ते आपल्या खोलीत निघून गेले. साधारण ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील रिवॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी खोलीकडे धाव घेतल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.

या घटनेनंतर बाबासाहेब मनोहरे यांना तात्काळ लातूर शहरातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोहरे यांनी आपल्या डोक्यात गोळी झाडली असल्यामुळे त्यांच्या मेंदूला इजा झालेली आहे. कवटी फुटून कवटीचे तुकडे मेंदूत गेले होते. ते आज पहाटे झालेल्या शस्त्रक्रियेत बाहेर काढण्यात आले आहेत. मनोहरे यांच्यावरील पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. मेंदूचं फाटलेलं आवरणही दुरुस्त करण्यात आलं आहे.

पुढील ४८ तास त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं जाणार आहे. त्यांच्या प्रकृतीतील बदलानुसार त्यांच्यावर उपचार केले जातील अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, बाबासाहेब मनोहरे यांनी धाराशीव, नांदेड या जिल्ह्यात काम केले आहे. लातूर महानगरपालिकेत ते सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांना बढती मिळून ते याच महानगरपालिकेत आयुक्त झाले.

बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याबद्दल आता पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यांच्याकडील रिवॉल्वर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे. याबाबत आता लातूर पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर लातूरसह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!