SHOCKING CRIME : पोलिस भरतीची फी मागितली, पण वडिलांनी दिली नाही; सैतान बनलेल्या मुलाने मारहाण करत केला जन्मदात्याचा खून

लातूर : न्यूज कट्टा  

वडिलांनी पोलिस भरतीसाठी पैसे दिले नाहीत, पण घरातील गॅस सिलेंडरसाठी पैसे दिल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या पित्याला मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी चाकूर पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

देविदास काशीनाथ पांचाळ (वय ७०) असं खून केलेल्या दुर्दैवी पित्याचं नाव आहे. तर खून प्रकरणी अजय देविदास पांचाळ (वय २४) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील हिंपळनेर येथील अजय पांचाळ याने आपल्या वडिलांना पोलिस भरतीची फी भरण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी पैसे नसल्याचे मुलाला सांगितले. त्यानंतर वडिलांनी घरात गॅस सिलेंडर आणला.

पोलिस भरतीच्या फिसाठी पैसे नसताना गॅस सिलेंडर कसा आणला असा सवाल विचारत त्याने वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्याने लाकडाने वडिलांना बेदम मारहाण केली. फीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून सैतान बनलेल्या मुलाच्या मारहाणीत वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी त्याची आई शारदाबाई पांचाळ यांनी चाकूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अजय पांचाळ याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिस भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलानं केलेल्या हैवानी कृत्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही हबकून गेले. पैशांसाठी जन्मदात्या वडिलांचा खून झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण लातूर जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणी अधिक तपास चाकूर पोलिस करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!