पुणे : न्यूज कट्टा
मध्यरात्री पत्नीचा गळा दाबून खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीला पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीचा जीव घेतल्यानंतर मृतदेह दुचाकीवरून नेतानाच पोलिसांनी हटकलं आणि या खूनाचं बिंग फुटलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बबीता राकेश निसार असं या घटनेत मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. या खून प्रकरणी या महिलेचा पती राकेश रामनायक निसार याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, राकेशने मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यानं पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन केला.

रात्री तो आपल्या दुचाकीवरून पत्नीचा मृतदेह घेऊन जात असताना रात्र गस्तीसाठी चाललेल्या पोलिस पथकाने त्याला हटकले. त्याचं वागणं संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्यानं पत्नीचा खून करून मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी निघाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी राकेश निसार याच्यावर गुन्हा दाखल केला असून पत्नीचा खून का केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.





