सिल्लोड : न्यूज कट्टा
कृषी कार्यालयातील वरिष्ठांकडून सातत्यानं होणारा अपमान आणि मानसिक छळाला कंटाळून एका कृषी सहाय्यकाने सिल्लोड तालुका कृषी कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका कृषी सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे.
योगेश शिवराम सोनवणे (४०, रा. जैनाबाद, जि.जळगाव, ह. मु. शिवाजीनगर, सिल्लोड) असं या आत्महत्या केलेल्या कृषी सहाय्यकाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी विमल योगेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर शामलाल बरदे, कृषी सहाय्यक किशोर उत्तम बोराडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश सोनवणे हे सिल्लोड शहरात असलेल्या तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते. योगेश यांना त्यांचे वरिष्ठ व सहकारी हे सुट्टीच्या दिवशी कार्यालयात अतिरिक्त काम करण्यास भाग पाडत होते. तसेच सातत्याने त्यांना अपमानास्पद वागणूक देत होते. यातूनच गुरुवारी सकाळी त्यांनी कृषी कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योगेश यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. योगेश यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे आणि कृषी सहाय्यक किशोर बोराडे यांच्यामुळेच योगेश यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या पत्नी विमल सोनवणे यांनी केला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत पोलिस ठाण्यासामोरच ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, योगेश सोनवणे यांनी आत्महत्येपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेले वाद आणि संभाषण यांचे स्क्रीनशॉटस कार्यालयीन ग्रूपवर शेअर केले आहेत. याबाबत अधिक तपास सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी. आर. कायंदे करीत आहेत.





