SHOCKING : लग्नमंडपातच काळाचा घाला; लग्नाचा विधी झाला अन काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू

बागलकोट : न्यूज कट्टा 

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो. मात्र कर्नाटकमध्ये एका कुटुंबासाठी हा सोहळा अचानकपणे दु:खात बदलला आहे. जामखंडी येथे एका लग्नसमारंभात विधी सुरू असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्न लागल्यानंतर अवघ्या तीन सेकंदांतच २६ वर्षीय नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या नवरदेवाचा मृत्यू झाला.

प्रवीण कुर्ने असं या दुर्दैवी नवरदेवाचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, कुम्बरेहळ्ळी गावातील कुर्ने कुटुंबातील प्रवीण याचा नंदिकेश्वर कल्याण मंडप येथे विवाह आयोजित करण्यात आला होता. बँकेत नोकरीला असलेल्या प्रवीणच्या विवाहामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. लग्नापूर्वीचे सर्व सोपस्कार मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडले होते. लग्नाच्या निमित्तानं सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यावर नवरा-नवरीने भर दिला होता.

ठरल्याप्रमाणे विवाह सोहळ्याचं उत्तम नियोजन झालं होतं. उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रवीणचा विवाह सोहळाही पार पडला. आपल्या पत्नीला मंगळसूत्र घालून नवविवाहित जोडपे पारंपारीक विधीसाठी व्यासपीठावर उभे होते. त्याचवेळी अचानक प्रवीणच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर काही क्षणातच प्रवीण थेट खाली कोसळला. त्याला तात्काळ जवळच असलेल्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

प्रवीणच्या आकास्मित निधनानंतर त्याचे आई-वडील, नातेवाईक आणि वऱ्हाड्यांचे अश्रू थांबत नव्हते. ज्या घरात सून आणायची स्वप्नं पाहिली होती, तिथेच आपल्या लाडक्या मुलाचं पार्थिव नेण्याची वेळ त्यांच्या नशिबी आली. या दुर्दैवी घटनेत प्रवीणच्या नवविवाहित पत्नीचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं. लग्नाच्या काही क्षणांनंतरच ती विधवा झाली. आपल्या डोळ्यांसमोरच नवऱ्याचा मृत्यू पाहून तिनेही आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. तिच्या आक्रोशाने उपस्थित सगळ्यांचे मन हेलावून गेले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!