माळशिरस : न्यूज कट्टा
पती-पत्नीच्या नात्याची गोड सुरुवात अर्थात विवाह करताना प्रत्येक दांपत्य पुढील आयुष्याची स्वप्नं रंगवत असतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले जातात. त्यातूनच सुखाचा संसार फुलतो.. मात्र सोलापूर जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांनाच हेलावून टाकलं. आदल्या दिवशी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल्याची घटना माळशिरस तालुक्यात घडली आहे.
जानकी असं हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या नववधूचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळशिरस तालुक्यातील बाभूळगांव येथील समीर हरिदास पराडे आणि माढा तालुक्यातील घोटी येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे या दोघांचा मंगळवार दि. १३ मे रोजी निरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर परंपरेनुसार नववधू जानकी ही आपल्या सासरी आली.
सर्वांशी हसतखेळत संवाद, गप्पागोष्टी झाल्या. आपल्या पतीसोबत सुखी संसाराची रंगवलेली स्वप्नं प्रत्यक्षात येणार हा विचारच तिला आनंद देणारा होता. मात्र नियतीला तिचा आनंद मान्य नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीला अचानक छातीत कळा येऊ लागल्या. तिला जास्तच त्रास होऊ लागल्यानं कुटुंबीयांनी तात्काळ अकलूज येथील खासगी रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच नियतीने तिचा जीव घेतला आणि जानकी व समीरच्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा काही क्षणात चुराडा झाला.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं पराडे आणि गळगूंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोठ्या शोकाकुल वातावरणात जानकीवर बाभुळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. समीर आणि जानकीच्या सुखी संसाराला सुरुवात होण्याआधीच सगळं काही संपल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





