पिंपरी चिंचवड : न्यूज कट्टा
पिंपरी चिंचवडमध्ये आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामखेड तालुक्यातील दोन तरुण मित्रांनी मोशी परिसरातील खिरीड वस्ती भागात एका झाडाला एकाचवेळी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवडसह जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तुषार अशोक ढगे (वय २५) आणि सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय ३०, दोघेही रा. हुंडा पिंपळगाव, ता. जामखेड) अशी आत्महत्या केलेल्या दोघा मित्रांची नावं आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुषार आणि सिकंदर हे दोघे एकमेकांचे जवळचे मित्र होते. काल दि. ११ एप्रिल रोजी ते मूळ गाव जामखेड येथून पुण्याला आले होते. दोघांनी पिंपरी चिंचवडमधील मोशी भागातील निर्जनस्थळी असलेल्या खिरीड वस्ती येथे एका झाडाच्या एकाच फांदीला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
मयत तुषार याचे चुलते दत्तात्रय रावसाहेब ढगे (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तुषार व सिकंदर हे दोघेही चालक होते. दोघांनी एकाच झाडाला, एकाचवेळी गळफास घेतल्यामुळे ही आत्महत्या पूर्वनियोजित असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या दोघांच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासह हे दोघे पुण्यात कधी आणि कोणत्या उद्देशाने आले याचा तपास पोलिस करत आहेत. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइलमधील माहितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.





