केडगाव : न्यूज कट्टा
पती-पत्नीचा वाद सुरू असताना चुलतीने रागाच्या भरात त्रिशूळाने केलेल्या हल्ल्यात एका निष्पाप ११ महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अवधूत मेंगावडे असं या दुर्दैवी बालकाचं नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील केडगाव-आंबेगाव पुनर्वसन येथे वास्तव्यास असलेल्या नितीन मेंगावडे व त्यांची पत्नी पल्लवी यांच्यात घरगुती वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करण्यासाठी पल्लवीची जाऊ भाग्यश्री मेंगावडे ही आपल्या ११ महिन्यांच्या अवधूत या बाळाला कडेवर घेऊन तेथे आली. त्यावेळी नितीन आणि पल्लवी यांच्यातील वाद तीव्र झाला होता.
वादाच्या रागातून पल्लवीने घरातील देवीसमोरील त्रिशूळ उचलून पती नितीनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्रिशूळाचा वार चुकवताना, त्रिशूळ थेट भाग्यश्रीच्या कडेवर असलेल्या अवधूतच्या कपाळात घुसला. त्यानंतर अवधूतला तातडीने केडगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अवधूत हा भाग्यश्रीचा एकुलता एक मुलगा होता, तिच्या दोन मुलींनंतर जन्मलेल्या अवधूतच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मेंगावडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी भाग्यश्री मेंगावडे यांच्या फिर्यादीवरून पल्लवी व नितीन मेंगावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरु आहे.





