SHOCKING : ऑनलाईन गेममध्ये १ लाख जिंकले, भावाने ६५ हजार घालवले अन् त्यानं एकाच ताटात जेवणाऱ्या भावाला संपवले..!

छत्रपती संभाजीनगर : न्यूज कट्टा

ऑनलाईन गेममध्ये जिंकलेल्या १ लाख रुपयांपैकी मावसभावाने ६५ हजार रुपये घालवले. याचाच राग मनात धरून दररोज एकाच ताटात जेवणाऱ्या भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. विशेष म्हणजे, आपण काहीच केलं नाही असा आविर्भाव आणत आरोपी चक्क पतंग उडवायला गेल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. अतिशय क्लिष्ट अशा या गुन्ह्याची छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी उकल केली आहे.

प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, उस्मानपुरा) असं खून झालेल्या दुर्दैवी युवकाचं नाव आहे. त्याचा त्याच्या साडेसतरा वर्षांच्या मावसभावानेच चाकूने वार करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रदीप हा आपल्या मावसभाऊ आणि काही मित्रांसह उस्मानपूरा भागात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. प्रदीपला आणि त्याच्या मावसभावाला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती. या गेममध्ये प्रदीपच्या मावसभावाने १ लाखांपेक्षा अधिक रक्कम जिंकली होती. मात्र प्रदीप हा याच गेममध्ये ६५ हजार रुपये हरला होता. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाला होता.

आपण जिंकलेले ६५ हजार रुपये घालवल्याचा राग प्रदीपच्या मावसभावाच्या मनात होता. त्यातूनच मकरसंक्रांतीदिवशी सायंकाळी प्रदीप एकटा असल्याची संधी साधत त्यांच्या मावसभावाने प्रदीपवर चाकूने सतरा वार करत त्याचा जीव घेतला. त्यानंतर प्रदीपच्या अंगावर पांघरून टाकून शेजारीच तो मोबाईल खेळत बसला. काही वेळाने बाहेर गेलेले सहकारी परत आल्यानंतर तो पतंग उडवण्यासाठी निघून गेला. रात्री उशीरा प्रदीपचा खून झाल्याचं त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

कोणताही पुरावा नसल्याने या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहा विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला पोलिसांनी प्रदीपच्या रूममधील सहकाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर मावसभावाला चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र तो वेळोवेळी वेगवेगळी हकीकत ऐकवत होता. कॉलर उडवण्यावरून कॉलेजमध्ये झालेल्या वादातून प्रदीपचा खून झाल्याचा संशय त्यानं व्यक्त केला. त्यामुळं पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे तपास केला, मात्र हाती काहीच लागले नाही.याचदरम्यान, प्रदीपचा मावसभाऊ वारंवार जबाब बदलत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान, प्रदीपच्या खूनानंतर त्याच्या मावसभावाने मिस यू भावा असं स्टेटस ठेवत शवविच्छेदनावेळी हजेरी लावली होती. यावेळी आपला मावसभाऊ वारला म्हणून तो सर्वांसमोर रडत होता. प्रत्यक्षात मात्र त्यानंच अवघ्या ६५ हजार रुपयांसाठी आपल्या मावसभावाला संपवल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला सज्ञान समजावे यासाठी पोलिसांकडून न्यायालयात पाठपुरावा केला जाणार आहे. दरम्यान, सहा पथकांद्वारे या घटनेचा तपास करण्यात आला. यामध्ये उस्मानपुरा, गुन्हे शाखा, सातारा, सिडको, मुकुंदवाडी आणि सिडको एमआयडीसीच्या विशेष पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!