बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
सोमवारी बारामतीत झालेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याची सूचना केली होती. त्यानंतर आता पक्ष संघटनेत पद मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मात्र केवळ पद न मिरवता सर्वसामान्यांशी नाळ जोडून राहणाऱ्यांनाच पदे द्यावीत अशी मागणी सामान्य नागरिकांसह कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे.
बारामतीत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजितदादांनी लोकसभा निकालावर भाष्य करताना पराभवाला स्वत: जबाबदार असल्याचं सांगितलं. त्याचवेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या बुथवर आपण कमी का पडलो याबद्दल आत्मचिंतन करावं असं सांगत जिथे आपण कमी पडत असू तिथे इतरांना संधी दिली पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं.
विशेष म्हणजे, यापुढील काळात मला पक्षसंघटनेत काही बदल करावे लागणार आहेत. येत्या १५ ऑगस्टपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं सांगत बारामती शहर व तालुक्यातील पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे अजितदादांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आता कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत पदाधिकाऱ्यांच्या मनमानीचा मोठा फटका अजितदादांना बसल्याची चर्चा गेली अनेक दिवस होत आहे. सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जोडून न ठेवता ठराविक लोकांना जवळ करणे, लोकांशी अविर्भावात वागणे, कार्यकर्त्यांच्या कामात टाळाटाळ करणे अशा अनेक तक्रारी केल्या जात होत्या. आम्ही दादांवर जीवापाड प्रेम करतो, पण चहापेक्षा किटलीच जास्त गरम होत आहे अशी अवस्था असल्याचं कार्यकर्ते आणि सामान्य जनतेतून बोललं गेलं. त्याचाच फटका या निवडणुकीत बसल्यामुळे अजितदादांनी पक्ष संघटनेत बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला.
‘दादा.. यांनाच संधी द्या’
दरम्यान, अजितदादांच्या आदेशानंतर जवळपास सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सोपवले आहेत. त्यामुळे आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये केवळ पुढेपुढे करणाऱ्यांना संधी न देता सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेल्यांनाच संधी द्यावी, अशी अपेक्षा सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
सद्यस्थिती गावागावांमध्ये, तसेच शहरात कोणताही गटतट न ठेवता सर्वांना एकसंघ ठेऊन काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. त्याचवेळी त्याच्या व्यक्तीगत बुथवरील मताधिक्याचाही विचार होणे आवश्यक आहे. केवळ पद असताना लोकांशी संपर्क ठेवायचा आणि अन्य वेळी आपल्या उद्योग-धंद्यात रमायचे अशांना संधीच देऊ नये अशीही मागणी केली जात आहे. पक्षाला पूर्ण वेळ देऊन वेळप्रसंगी कोणत्याही गोष्टीत मागे न राहणाऱ्या व्यक्ती पक्षसंघटनेत सक्रिय करणे आवश्यक असल्याचं मतही या निमित्तानं व्यक्त होत आहे.
असे कार्यकर्ते सक्रिय होणे आवश्यक
मागील काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रचंड मेहनत करणारे काही चेहरे शहर आणि तालुक्यात होते. त्यांच्या माध्यमातून दिलेल्या पदाची जबाबदारी पार पाडतानाच पक्ष संघटन वाढवण्यावर भर देण्यात आल्याचेही संपूर्ण शहर आणि तालुक्याने अनुभवले आहे. मात्र काळाच्या ओघात अशा लोकांना बाजूला राहावे लागले. काम करण्याची क्षमता असलेल्या आणि लोकांशी तितक्याच आत्मियतेने वागणाऱ्या चेहऱ्यांना या बदलांमध्ये संधी देणे आवश्यक आहे.
फटकळ पदाधिकारी नको रे बाबा
बारामती शहर आणि तालुक्यातील अनेकांना पक्षाने वेगवेगळ्या पदांवर संधी दिली. मात्र काहीजण काम कमी आणि फटकळपणाच जास्त करतात असाही अनुभव अनेकांना आला आहे. त्यामुळे नव्याने निवडी करताना फटकळ वागणाऱ्यांना बाजूला ठेवणेच पक्ष हिताचे ठरणार आहे. लोकांशी आपुलकीने वागणारे, आपल्या पदाचं महत्व जाणणारे चेहरेच सध्याच्या स्थितीत लोकांची अपेक्षा पूर्ण करणारे ठरतील. त्यामुळे कामाची पद्धत, लोकांमध्ये असणारा वावर आणि जनसंपर्क यासह लोकसभा निवडणुकीतील कामगिरी या बाबींचा विचार करूनच पदाधिकारी निवडी केल्या जाव्यात अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.





