पुणे : न्यूज कट्टा
पुणे शहरात एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं महागात पडलं आहे. वडापाव घेण्यासाठी थांबलेल्या महिलेला तुमचे पैसे पडल्याचे सांगत दुचाकीला लावलेली दागिन्यांची पिशवी लंपास केल्याची घटना घडली आहे. या पिशवीत १४ लाख रुपयांचे १९५ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने होते. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, मांजरी येथे वास्तव्यास असलेले दशरथ धामणे आणि त्यांच्या पत्नी जयश्री हे दोघेही बँकेत तारण ठेवलेले १९५ ग्रॅम सोने ताब्यात घेतले होते. ही दागिन्यांची पिशवी दुचाकीच्या पुढील बाजूला लटकवून ते दोघेही घरी परतत होते. या दरम्यान, दशरथ धामणे हे रस्त्यात असलेल्या रोहित वडेवाले येथे नातवंडांना वडापाव घेण्यासाठी गेले. तर त्यांच्या पत्नी जयश्री या त्यांच्या दुचाकीजवळ थांबून होत्या.
त्यावेळी जयश्री यांच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला व त्याने तुमचे पैसे मागे पडले आहेत असं सांगून त्यांचं लक्ष विचलित केलं. जयश्री धामणे या पैसे पडलेत का ते पाहण्यासाठी मागे आल्या असताना चोरट्याने संधी साधून या दुचाकीला अडकवलेली दागिन्यांची पिशवी लंपास केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या पिशवीमध्ये १४ लाख रुपये किमतीचे सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या आणि इतर असे १९५ ग्रॅम सोन्याचे दागिने होते.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.





