बारामती : न्यूज कट्टा
सध्या राज्यात सर्वत्रच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशात बारामतीत नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यानं आपल्या घराच्या कामाविषयी माहिती देतानाच एका विशेष कार्यक्रमाचं निमंत्रण अजितदादांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती येथील राष्ट्रवादी भवनामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या दरम्यान, बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याने अजितदादांची भेट घेतली. निवडणुकीच्या धामधुमीतही अजितदादांनी सूरज चव्हाणची भेट घेत त्याच्या घराच्या कामाबद्दल माहिती घेतली.
बिग बॉस मराठी या शोमधून सूरज चव्हाण हा प्रकाशझोतात आला. बारामती तालुक्यातील मोढवे येथील रहिवासी असलेल्या सुरजला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वखर्चातून घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्णत्वाला जाणार असून अजितदादांच्या संकल्पनेतून बांधल्या जात असलेलं आलिशान घर सुरजला मिळणार आहे.
दरम्यान, सूरज हा लवकरच विवाहबद्ध होणार आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ आणि बातम्या सोशल मिडियात व्हायरल झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरच सुरजने अजितदादांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. सूरजने त्याच्या लग्नाचे खास निमंत्रण अजितदादांना दिल्याची माहिती आहे.





