भवानीनगर : न्यूज कट्टा
काल संपूर्ण देशभरात धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ग्रामीण भागातही धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला.. मात्र बारामतीत कामानिमित्त आलेल्या एकाला मित्रांना सोबत घेऊन धुळवड साजरी करणं भलतंच महागात पडलं आहे.. धुळवडीचा एन्जॉय केल्यानंतर चौघांपैकी एकाला कार चालवण्याची हुक्की आली आणि त्यानं चक्क कारमधून मालकालाच फेकून दिल्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे घडला.
आष्टी तालुक्यातील चौघेजण बारामतीत काही कामानिमित्त आले होते. काही कारणास्तव हे काम झाले नाही. त्यामुळं संबंधित चार मित्रांनी बारामतीतच धुळवड साजरी करण्याचं ठरवलं.. चौघांनी मनसोक्त मद्यप्राशन करत एन्जॉय केला.. त्यानंतर ते भवानीनगर येथील एका नातेवाईकांना भेटून गावाकडे जायला निघाले..
भवानीनगरमधून निरगुडे गावात प्रवेश करताच कारमधील एकानं मीच गाडी चालवतो असा हेका धरला.. मात्र कार मालकानं नकार दिल्यामुळं या पठ्ठ्यानं थेट त्याला कारमधून बाहेर फेकून दिलं आणि कार घेऊन पळ काढला.. त्याचवेळी या कारमालकाला काही स्थानिक कामगार भेटले.. त्यांनी दुचाकीवरून या कारचा पाठलाग केला.. मात्र धुळवडीचा फूल्ल एन्जॉय डोक्यात असल्यानं कारचालकानं दुचाकीलाच धडक दिली.. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही रस्त्याच्या बाजूला पडले..
त्यानंतर संबंधित कार घेऊन तिघेजण भिगवणच्या दिशेने निघून गेले.. कारमधून खाली फेकलेल्या कारमालकानं हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला.. त्यांनी तात्काळ निरगुडे गावात धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं.. मात्र मित्रांना सोबत आणलेल्या कार मालकाला या घटनेमुळं चांगलीच अद्दल घडली.. ‘खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बाराह आना’ अशीच अवस्था या कारमालकाची झाल्याची चर्चा आता या परिसरात झडू लागली आहे..





