VANRAJ ANDEKAR : वनराज आंदेकर यांच्या हत्येवर वडील बंडू आंदेकर यांची प्रतिक्रिया; त्यांनी माझ्या निरपराध मुलाला मारलं, मी बदला घेणार.. पण..

पुणे : न्यूज कट्टा

मागील काळात आम्ही गुन्हेगारीत होतो. पण आता सगळं काही सोडलं होतं. त्यांना इतकंच वाटत होतं तर आम्हाला मारायचं होतं.. त्यांनी माझ्या निरपराध मुलाला का मारलं असा सवाल करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचे वडील बंडू आंदेकर यांनी आता या घटनेनंतर आम्ही न्यायाची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही या हत्येचा बदला घेणार, पण तो कायदेशीर मार्गाने असेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

रविवारी दि. १ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडत तसेच कोयत्याने वार करत त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकणार अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वनराज आंदेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपण असा कोणताही मार्ग स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे.

वनराज यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या दोन मुली आणि पत्नी निराधार झाल्या आहेत. त्यांना आधार देणं हे माझं काम आहे. मीच जर तुरुंगात गेलो, तर त्यांना आधार कोण देणार असा सवाल बंडू आंदेकर यांनी उपस्थित केला. या हत्येचा बदला घेण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं गुन्हेगारी कृत्य करणार नाही. तसं केलं तर माझं कुटुंब उघड्यावर पडेल. त्यामुळे या प्रकरणात आपण न्यायाची प्रतीक्षा करत आहोत आणि कायदेशीर मार्गानेच या हत्येचा बदला घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

खरं तर आमची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र आम्ही यापासून आता लांब आहोत. असं असताना त्यांना मारायचंच होतं तर मला मारायला हवं होतं. पण त्यांनी माझ्या निरपराध मुलाची हत्या केली. माझ्या घरात आता कुणीही गुन्हेगार नाही. केवळ जुन्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी माझीच मुलगी माझ्या मुलाची वैरिण झाली आणि तिने सोमनाथ गायकवाडच्या साथीने ही हत्या घडवून आणली असंही बंडू आंदेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संपत्तीतून निर्माण झालेला कौटुंबिक वाद हे वनराज आंदेकर यांच्या हत्येचं कारण असलं तरी याला टोळीयुद्धाचीही किनार आहे. सख्ख्या बहिणीने भावाचा काटा काढण्यासाठी आंदेकर टोळीवर टपून असलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेऊन वनराज आंदेकर यांची हत्या घडवल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेकांची चौकशी केली असून पंधरापेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!