खेळता खेळता त्या भावंडांनी कालव्यात उडी मारली अन होत्याचं नव्हतं झालं; तीन वर्षांच्या चिमूरड्याचा मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना

दौंड : न्यूज कट्टा  

दौंड तालुक्यातील सहजपुर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खेळता खेळता तीन चिमुकल्यांनी कालव्यात उडी मारली. या घटनेत एका तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सहजपुर येथील माकरवस्ती परिसरात आज सकाळी ही घटना घडली.

आसिम जावेद मुजावर (वय ३) असं कालव्यात बुडून मृत पावलेल्या चिमूरड्याचं नाव आहे. तर महेक जावेद मुजावर (वय ७) आणि रूहान जावेद मुजावर (वय ५) अशी या घटनेत वाचलेल्या भावंडांची नावं आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुजावर कुटुंबीय सहजपुर येथील माकरवस्ती परिसरात कालव्याच्या बाजूलाच वास्तव्यास आहेत. आज सकाळी ही तिघेही भावंडं कालव्यालगत खेळण्यासाठी गेली होती.

खेळत असताना तिघांनीही कालव्यात उडी मारली. हा प्रकार शेजारीच राहत असलेल्या एका महिलेने पाहिला. तिनं मुलांनी पाण्यात उड्या मारल्या असं म्हणत आरडाओरड केल्यानंतर नीलेश खोमणे यांनी तात्काळ पळत जाऊन कालव्यातून दोघा चिमूरड्यांना बाहेर काढलं. तोपर्यंत आसिम हा पाण्यात बुडाला होता. स्थानिक नागरिकांनी शोधाशोध केल्यानंतर तो एका बाजूला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.

आसिमला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या घटनेनंतर सहजपुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी यवत पोलिस अधिक तपास करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!