पुणे : न्यूज कट्टा
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आंदेकर टोळीने सोमनाथ गायकवाड टोळीतील निखिल आखाडेची हत्या केली होती. वर्षभरातच याचा बदला घ्यायचा अशी शपथ सोमनाथ गायकवाडने घेतली. त्यानुसार वर्ष पूर्ण होण्याआधीच वनराज आंदेकर यांचा गेम करण्यात आल्याचे आता पोलिस तपासात समोर आले आहे. आंदेकरला एका वर्षाच्या आत ठोकायचं होतं, त्यानुसार आम्ही बदला घेतला अशी कबुली सोमनाथ गायकवाड याने दिली आहे.
रविवार दि. १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची नाना पेठेत गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती. बहिणीसोबत संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचं बोललं जात होतं. वनराज यांच्या बहिणीने सोमनाथ गायकवाड याच्या टोळीची मदत घेत ही हत्या घडवून आणली. विशेष म्हणजे सोमनाथ गायकवाड हा गेल्या वर्षभरापासून वनराज आंदेकर यांच्यावर टपुन होता ही बाबही पोलिस तपासात समोर आली आहे.
सोमनाथ गायकवाड हा अनेक वर्ष आंदेकर यांच्याच टोळीत होता. मात्र काही वर्षांपूर्वी तो या टोळीपासून विभक्त झाला आणि त्याने स्वत:ची टोळी निर्माण केली. या दोन्ही टोळ्यांमध्ये सातत्याने वाद सुरू होत होते. त्यातूनच ३ ऑक्टोबर २०२३ रोजी सोमनाथचा साथीदार निखिल आखाडे याचा चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरने भोकसून खून करण्यात आला होता. याचवेळी अनिकेत दूधभाते हाही गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर सोमनाथने आंदेकर टोळीचा वर्षभरात बदला घ्यायची शपथ घेतली होती.
सातत्याने होणारे वाद आणि मिळणारी धमकी यामुळे आपल्याला जीवंत राहायचं असेल तर आंदेकर टोळी संपवलीच पाहिजे ही बाब सोमनाथने निश्चित केली होती. त्यासाठी तो संधी शोधत असतानाच त्याला वनराज आंदेकर यांच्या सख्ख्या बहिणीची साथ मिळाली. त्यातूनच त्याने वनराज आंदेकर यांची हत्या करत आपला बदला पूर्ण केल्याचे पोलिस तपासात सांगितले.
आंदेकर टोळी संपवली तर माझा फायदा होता. माझं साम्राज्य वाढणार होतं. त्यामुळे माझ्यासाठी वनराज आंदेकरचा गेम करणं महत्वाचं होतं. वर्षभरापूर्वी मी तशी शपथ घेतली आणि वर्ष पूर्ण व्हायच्या आतच वनराजची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्यासाठी तब्बल एक ते दीड महिन्यांपासून वनराजच्या हालचालींवर बारकाईने लक्ष देत होतो असेही सोमनाथ गायकवाड याने पोलिस तपासात सांगितले.





