इंदापूर : न्यूज कट्टा
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळं शरद पवार गटात प्रचंड नाराजी असून येत्या विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय उभा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी इंदापूर शहरातील बाजार समिती मैदानात परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये इंदापूरमधील विधानसभा उमेदवार निश्चितीसह पुढील दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे या सभेकडे इंदापूर तालुक्याचं लक्ष लागलं आहे.
मागील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. महायुतीकडून उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता असल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटाचा पर्याय निवडला. मात्र आता त्यांच्या प्रवेशानंतर इंदापूरमधील मातब्बर नेते म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने आणि कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी इंदापूर तालुक्यातील नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतरही हर्षवर्धन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता इंदापूर शहरातील बाजार समिती मैदानात परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात तिसरा उमेदवार देण्याबाबत घोषणा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
संकटाच्या काळात साथ दिलेल्या इच्छुकांचा विचार न करता हर्षवर्धन पाटील यांना ऐनवेळी आयात केल्यामुळे इंदापूरमध्ये तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यापुढील डोकेदुखी वाढणार आहे. वास्तविक महायुतीत आपल्याला विधानसभा निवडणूक लढवण्याची संधीच मिळणार नाही ही बाब लक्षात आल्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाचा आसरा घेतला. मात्र त्याही ठिकाणी पक्षांतर्गत विरोध असल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन पाटील यांना हुलकावणी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पक्ष बदल करूनही हर्षवर्धन पाटील यांच्यापुढील विघ्न थांबत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.





