ACB TRAP : गुन्ह्यात मदतीसाठी चार लाखांची लाच घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाळ्यात; घरासह पोलिस ठाण्यातही सापडलं मोठं घबाड..!

नवी मुंबई : न्यूज कट्टा     

इमारत कोसळल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात मदतीसाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. उलवे येथे कदम हे राहत असलेल्या इमारतीखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कदम यांनी यापूर्वी तक्रारदाराकडून १४ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर पुन्हा पाच लाखांची मागणी केली होती.

याबाबत माहिती अशी की, बेलापूर येथील इमारत दुर्घटना प्रकरणात तक्रारदारांच्या वडिलांना अटक झाली होती. ते केवळ गुंतवणूकदार असताना विकासक व जागामालकाबरोबर त्यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याचा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआरआय पोलिस ठाण्याकडून सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांनी या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यात पहिल्यांदा १२ लाख रुपये आणि नंतर २ लाख रुपये सतीश कदम यांना पोहोच करण्यात आले होते.

याचदरम्यान, दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी ५ लाख रुपये द्यावेत अशी मागणी सतीश कदम यांनी तक्रारदारांकडे केली होती. पैशांच्या सततच्या मागणीमुळे संबंधित तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. मंगळवारी रात्री कदम यांनी तक्रारदाराला स्वत:च्या उलवे येथील घराखाली बोलवले. तक्रारदाराने चार लाख रुपये सतीश कदम यांना दिले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सतीश कदम यांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी कदम हे कार्यरत असलेल्याच एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांच्यावरील कारवाईनंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये ४८ लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. तर पोलिस ठाण्यात तपासणी केल्यानंतर त्यांच्या कक्षातील कपाटातून ८ लाख ७० हजार रुपये रोख मिळून आले आहेत. एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकावरील कारवाईनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!