बारामती । न्यूज कट्टा
बारामती शहरात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या अकॅडमींना नियमबाह्य पद्धतीने फायर एनओसी दिल्याच्या प्रकरणात बारामती नगरपरिषदेचे तत्कालीन अग्निशमन अधिकारी दोषी असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे. मात्र अद्याप या अधिकाऱ्यावर प्रशासकीय पातळीवर कोणतीच कारवाई झालेली नाही. दरम्यान, कारवाईत चालढकल होत असल्यानं या चौकशी समितीत असलेल्या बारामतीतील अधिकाऱ्यांवरच संशय निर्माण होऊ लागला आहे.
बारामती शहर आणि परिसरात मागील काही वर्षात अकॅडमींचं पेव फुटलं आहे. गुणवत्तेचं आमिष दाखवत या अकॅडमींकडून पालकांची सर्रास लूट केली जात आहे. विशेष म्हणजे, या अकॅडमींना शासनाची कोणतीच परवानगी नाही. मात्र कायद्याची पायमल्ली करत या अकॅडमींनी अक्षरश: धंदाच चालवला आहे. दुसरीकडे या अकॅडमी चालकांनी बारामती नगरपरिषदेतील अग्निशमन अधिकाऱ्याशी संगनमत करत नियमबाह्य पद्धतीने फायर एनओसी मिळवल्या होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच उपोषण, आंदोलन करत संबंधित फायर एनओसी रद्द करून अग्निशमन अधिकारी पद्मनाभ कुल्लरवार यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
दरम्यानच्या काळात मोहसीन पठाण यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यासही या अधिकाऱ्याने नकार दिला होता. याबाबत पठाण यांनी केलेल्या तक्रारीनंतर शासनाने चौकशी समिती नेमली. त्यामध्ये कुल्लरवार हे दोषी असल्याचे आढळून आले आहे. वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करत त्यांनी कर्तव्यात कसूर केली असून त्यांचे वर्तन शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय असल्याचे आणि ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याचे नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.
पद्मनाभ कुल्लरवार हे दोषी असल्याचं स्पष्ट होऊन कित्येक महीने उलटले आहेत. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या या अधिकाऱ्याला नेमकं कोण वाचवत आहे, असा सवाल या निमित्तानं मोहसीन पठाण यांनी उपस्थित केला आहे. या चौकशी समितीत मुख्याधिकारी पंकज भुसे यांचाही समावेश आहे. परंतु ते स्वत:च यापूर्वी बोगस बांधकाम परवाना दिल्याच्या प्रकरणात निलंबित झाले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या या समितीतील समवेशावरही मोहसीन पठाण यांनी शंका व्यक्त केली आहे.
पालकांची भरमसाठ लूट करणाऱ्या बेकायदेशीर अकॅडमींच्या चालकांशी संगनमत करून तत्कालीन अग्निशमन अधिकाऱ्याने फायर एनओसी दिल्या, ही बाब सर्वज्ञात आहे. असं असताना या अधिकाऱ्याला आणि बेकायदेशीर अकॅडमींना वाचवण्यामागे नेमका उद्देश काय असाही प्रश्न मोहसीन पठाण यांनी उपस्थित केला. याबाबत तात्काळ कारवाई करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळीच लगाम लावला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. तसेच याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.




