AJITDADA STATUE : अजितदादांचा पहिला पुतळा बारामतीत; येत्या गुरुवारी सुनेत्रावहिनींसह पवार कुटुंबीयांच्या उपस्थितीत होणार अनावरण..!

बारामती । न्यूज कट्टा 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. २३ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तसेच खासदार पार्थ पवार, युवा नेते जय पवार आणि पवार कुटुंबीय यांचीही उपस्थिती राहणार असल्याची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर दिली आहे.

बारामतीतील नटराज नाट्य कला मंडळ या संस्थेच्या वतीने दिवंगत अजितदादा पवार यांचा १० फूट उंचीचा कांस्य (ब्राँझ) धातूपासून तयार करण्यात आलेला भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा नटराज कलादालनासमोरील जागेत स्थापित करण्यात येत आहे. लोकार्पणानंतर तो नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला बुधवार दि. २२ जुलै रोजी अजितदादांच्या जयंतीदिनी पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे.

२३ जुलै रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पुतळ्याच्या लोकार्पणासह दिवंगत अजितदादा पवार यांच्या छायाचित्र दालनाचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वधर्मीय प्रार्थना, श्रद्धांजलीपर गीत तसेच भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला बारामतीसह परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन किरण गुजर यांनी केले आहे. दरम्यान, अजितदादांच्या निधनानंतर सर्वात पहिला पुतळा बारामतीत बसवण्यात येत आहे. त्यामुळे हा लोकार्पण सोहळा बारामतीतील एक महत्त्वाचा स्मरणदिन ठरणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव आणि स्मरण करण्यात येणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!