बारामती | न्यूज कट्टा
राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत ११७ युवकांची तब्बल ३ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती, बनावट कागदपत्रांचा वापर आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटचा सखोल तपास सुरू केला आहे.
रणजित हरिभाऊ मोटे (रा. सूर्यनगरी, बारामती) यांनी याबाबत बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सुभायु सरकार उर्फ राणा (मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या दिल्ली) आणि प्रमोद भगवान गुरव (सध्या घणसोली, नवी मुंबई) यांनी संगनमताने हा संपूर्ण प्रकार घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपींनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांतील अधिकाऱ्यांशी आपले थेट संबंध असल्याचे सांगून आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण विभाग तसेच भारतीय रेल्वे यांसारख्या विविध शासकीय विभागांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीची आरोपींशी सन २०२२ मध्ये ओळख झाली. त्यानंतर आरोपींनी सरकारी भरती प्रक्रियेत मोठा प्रभाव असल्याचा दावा करत प्रत्येक उमेदवाराची निवड निश्चित होईल, असे आश्वासन दिले. त्यासाठी पदानुसार प्रत्येक उमेदवाराकडून पाच ते सहा लाख रुपये घेण्याची अट घालण्यात आली. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी रणजित मोटे यांनी इच्छुक उमेदवारांची कागदपत्रे, शैक्षणिक माहिती आणि अर्ज गोळा करून आरोपींकडे सुपूर्द केले. सन २०२३-२४ मधील विविध भरती प्रक्रियांसाठी एकूण ११७ उमेदवारांचे अर्ज आरोपींकडे देण्यात आले. त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी ऑनलाइन व्यवहार तसेच रोख स्वरूपात मिळून एकूण ३ कोटी ७३ लाख रुपये स्वीकारले. मात्र, पैसे स्वीकारूनही कोणत्याही उमेदवाराला प्रत्यक्षात नोकरी मिळाली नाही.
बनावट नियुक्तीपत्रे आणि खोटे शिक्के
फिर्यादीनुसार, उमेदवारांचा संशय दूर करण्यासाठी आरोपींनी बनावट निवड यादी, खोटी नियुक्तीपत्रे आणि बनावट शासकीय शिक्के तयार करून ते उमेदवारांना दाखवले. काही उमेदवारांना नियुक्ती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत वेळकाढूपणा करण्यात आला, तर काहींना लवकरच आदेश मिळतील, अशी खोटी आश्वासने देण्यात आली. मात्र, दीर्घकाळ उलटूनही कोणालाही नोकरी मिळाली नसल्याने हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती, बनावट कागदपत्रांचा वापर, विश्वासघात आणि गुन्हेगारी कट रचणे आदी गंभीर कलमान्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, इतर जिल्ह्यांतील उमेदवारांचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाली आहे का, तसेच कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार नेमका कुठे व कसा झाला, याचा तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
सरकारी नोकरीच्या नावाखाली युवकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करणाऱ्या या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





