BIG BREAKING : मांगूर तस्करांना जलसंपदा विभागाचा झटका; उजनी परिसरातील बेकायदेशीर मच्छी तळी चार दिवसांत नष्ट करण्याच्या नोटीसा..!

इंदापूर : न्यूज कट्टा

आरोग्याला अपायकारक असलेल्या मांगूर माशाची मोठ्या प्रमाणात तस्करी  होत असून इंदापूर तालुक्यातून या तस्करीचं रॅकेट चालवलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी मांगूर माशाचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर आता जलसंपदा विभागानेही कारवाईचा बडगा उगारला आहे. उजनी जलाशयासाठी संपादित जमिनीवरील बेकायदेशीर मच्छी तळी चार दिवसांत नष्ट करण्याच्या नोटीसा जलसंपदा विभागाने बजावल्या आहेत.

मांगूर मासा हा आरोग्यासाठी घातक असून पर्यावरण आणि शेतीसाठीही धोकादायक आहे. त्यामुळे मांगूर माशाला शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही इंदापूर तालुक्यात कालठण परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर तळ्यांची निर्मिती करून त्यातून मांगूर माशाचे उत्पादन घेतले जात आहे. या तळ्यातून उत्पादित होणारे मासे आणि मत्स्यबीजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केली होती. त्यानंतर बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मांगूर मासा जप्त केला होता.

आता जलसंपदा विभागानेही या प्रकरणात कठोर पावले उचलली आहेत. उजनी जलाशयासाठी संपादित जमिनीवरील बेकायदेशीर मच्छी तळी चार दिवसांत नष्ट करण्याच्या नोटीसा जलसंपदा विभागाकडून बजावण्यात आल्या आहेत. संपादित जमिनीवर मच्छी तळी निर्माण करून उजनी जलाशयातील साठ्याला धोका निर्माण केला जात असल्याचे या नोटीसीत नमूद करण्यात आले असून पुढील चार दिवसात तळी नष्ट न केल्यास पाटबंधारे अधिनियम १९७६ नुसार गंभीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उजनी परिसरातील १०० हून अधिक तळ्यांच्या मालकांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

पर्यावरण व मत्स्य व्यवसाय विभागाकडूनही दखल

दुसरीकडे, कालठण परिसरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर तस्करीची पर्यावरण विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची या दोन्ही विभागांकडून माहिती घेण्यात येत असून त्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाणार आहे. आरोग्य विभागानेही याबाबत कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मांगूर तस्करांच्या मनमानीला लगाम लागणार आहे.

कारवाईत उशीर का..?

कालठण परिसरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर तस्करीवर पोलिसांनी २५ जुलै रोजी कारवाई केली. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसांनी म्हणजेच २७ जुलै रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तविक या प्रकरणात तात्काळ कारवाई होणे गरजेचे असताना गुन्हा दाखल करण्यास दोन दिवस विलंब का लागला असा सवाल मोहसीन पठाण यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागांकडे तक्रार दाखल करत या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह कारवाईत टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!