बारामती : न्यूज कट्टा
बारामती पंचायत समितीच्या गटनेतेपदी बाबा चोरमले यांची, तर उपगटनेतेपदी नितीन काकडे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडीबाबत पत्र देण्यात आले. दरम्यान, या निवडीनंतर आता बारामती पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बारामती पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहत गटनेता आणि उपगटनेता निवडीचे पत्र दिले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार या निवडी करण्यात आल्या. पळशी गावाच्या सरपंचपदी काम केलेल्या बाबा चोरमले यांच्यावर गटनेतापदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गेली अनेक वर्षे बारामती येथील राष्ट्रवादी भवनात कार्यरत असलेल्या नितीन काकडे यांना उपगटनेतेपदाची संधी देण्यात आली आहे.
गटनेता निवडीनंतर बारामती पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्यामुळे या पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. किरण तावरे, दिग्विजय जगताप आणि जितेंद्र पवार या तिघांच्या नावाची सध्या चर्चा आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता तालुक्याचा भौगोलिक आणि राजकीय अभ्यासाबरोबरच अनुभव असलेल्या सदस्याला सभापतीपदाची संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.
किरण तावरे यांनी संजय गांधी निराधार योजना समिती, राष्ट्रवादीचे तालुका युवकाध्यक्ष या पदांवर काम केले असून त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे यांनी मागील पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. प्रशासकीय आणि पक्षीय कामकाजाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. तर दिग्विजय जगताप यांनी वाणेवाडी गावाच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली आहे. तर जितेंद्र पवार हे वडगाव निंबाळकरमधील राजकारणात सक्रिय आहेत. या तिघांपैकी कुणाला संधी मिळणार यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.




