BEED RAILWAY : बीडकरांसाठी मोठी बातमी..! १७ सप्टेंबरला पुण्याशी रेल्वे जोडणी; डिसेंबरमध्ये बीड-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी सुनेत्रावहिनी आग्रही

मुंबई । न्यूज कट्टा

बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. या रेल्वेसाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच बीड–पुणे आणि बीड–मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुनेत्रा पवार होत्या. बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता व्ही. पी. पैठणकर, सीसीएम डॉ. सुमंत देऊळकर, विल्यम केरी यांच्यासह रेल्वे आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अजितदादांच्या प्रयत्नांना पुढचे पाऊल

बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी दिवंगत अजित पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अहिल्यानगर–बीड–परळी या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. गतवर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी बीड–अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली. आता याच ऐतिहासिक दिवशी बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे.

बीडच्या विकासाला मिळणार चालना

बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर बीडची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे जोडणी अधिक सक्षम होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कृषी, उद्योग, शिक्षण, व्यापार आणि सामाजिक क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वे सेवेमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे बीडच्या आर्थिक विकासासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

डिसेंबरअखेर मुंबईशी जोडणीचे लक्ष्य

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी उर्वरित तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक कामांचा कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त होणाऱ्या बीड–पुणे रेल्वेच्या शुभारंभ कार्यक्रमाची तयारीही नियोजनबद्ध आणि समन्वयाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

“बीड–पुणे आणि पुढे बीड–मुंबई ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी आहे. दिवंगत अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीत या रेल्वे जोडणीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!