SHOCKING : लेकाला वाचवायला बाप धावला, पती-मुलाला दरीत कोसळताना पाहून आईनेही घेतली झेप; एका क्षणात संसार संपला

छत्रपती संभाजीनगर । न्यूज कट्टा

“बाळा, खाली ये रे… हात जोडते, तुझ्या पाया पडते…” मुलाने टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून आई-वडील तब्बल तीन तास डोंगराच्या धोकादायक कड्यावर उभे राहून त्याला विनवणी करत होते. अखेर मुलगा काहीसा शांत होत असल्याचे दिसताच त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी पुढे पाऊल टाकले; मात्र निसरड्या कड्यावर त्यांचा तोल गेला आणि मुलासह ते शेकडो फूट खोल दरीत कोसळले. पती आणि मुलाला दरीत कोसळताना पाहून आईनेही त्याच दिशेने झेप घेतली. या दुर्दैवी घटनेत आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी दि. २१ ऑगस्ट रोजी तिसगाव शिवारातील खवड्या डोंगरावर घडली.

मुरलीधर दामोधर चांदगुडे (४८), संगिता मुरलीधर चांदगुडे (४२) आणि कुणाल मुरलीधर चांदगुडे (१९) अशी मृतांची नावे आहेत. चांदगुडे कुटुंब झाल्टा फाटा परिसरातील अक्षयबन सोसायटीसमोर राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल सकाळी सुमारे १० वाजता खवड्या डोंगरावरील अत्यंत धोकादायक कड्यावर जाऊन उभा राहिला होता. तो आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या मनःस्थितीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, माजी सरपंच संजय जाधव तसेच पोलीस कर्मचारी सुरेश भिसे आणि मंगेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुणालला सुरक्षित खाली आणण्यासाठी तब्बल तीन तास समजावण्याचे प्रयत्न सुरू होते. आई संगिता हात जोडून, अश्रू अनावर झालेले असताना मुलाला खाली येण्याची विनवणी करत होती. दीर्घ प्रयत्नांनंतर कुणाल काहीसा शांत होत असल्याचे दिसून आले.

एका क्षणात होत्याचे नव्हते झाले

कुणाल शांत होत असल्याचे पाहून त्याला पकडण्यासाठी वडील मुरलीधर पुढे सरसावले. मात्र, निसरड्या कपारीवर कुणालला पकडण्याचा प्रयत्न करताना त्यांचा तोल गेला. ते कुणालसह थेट खोल दरीत कोसळले. डोळ्यांसमोर पती आणि मुलगा दरीत कोसळल्याने संगिता हादरून गेली. काही क्षणांतच तिनेही दरीत झेप घेतली. उपस्थित पोलिस आणि जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करून तिघांनाही बाहेर काढले आणि घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.

किरकोळ वादातून घेतले टोकाचे पाऊल?

कुणालचा वडिलांशी किरकोळ खर्चाच्या पैशांवरून तसेच बँकेचा हप्ता बाऊन्स झाल्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या वादातून संतापलेल्या कुणालने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या १९ वर्षांच्या कुणालच्या या निर्णयामुळे एका कुटुंबावर काळाने घाला घातला. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही दुर्दैवी अंत झाल्याने छत्रपती संभाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिघांवरही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!