WARI : हातात टाळ, डोक्यावर टोपी अन् वारकऱ्यांशी संवाद.. संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झालेल्या अजितदादांचा अनोखा अंदाज..!

बारामती : न्यूज कट्टा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. डोक्यावर टोपी आणि हातात टाळ घेत अजितदादांनी पायी चालत वारकऱ्यांशी संवाद साधला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत अजितदादांनी फोटोसेशन करत आपला अनोखा अंदाज दाखवून दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवाडी या दरम्यान वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला. या दरम्यान, राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी अजितदादांच्या भेटीसाठी मोठी गर्दी केली. अजितदादांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत फोटोसेशनही केले.

या पायी वारीदरम्यान, अजितदादांनी वारकऱ्यांसोबतच दिंडी प्रमुख, विणेकरी, सोहळा प्रमुख व विश्वस्तांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.  यावेळी अनेक महिला व वारकऱ्यांनी अजितदादांची भेट घेत नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींबद्दल समाधान व्यक्त केले. एकूणच अजितदादांचा दिलखुलास स्वभाव पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी व भाविकांना भावणारा ठरला.

यावेळी खासदार सुनेत्रा पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

दरम्यान,  पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकाचौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा  मुक्काम आज इंदापूर तालुक्यातील सणसर येथे मुक्काम असणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!