BREAKING NEWS : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ऐतिहासिक निर्णय; ऊस उत्पादकांना प्रतिटन ४ हजारांचा अंतिम दर

सोमेश्वरनगर । न्यूज कट्टा  

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिटन ४ हजार रुपये अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये प्रतिटन ४ हजार रुपयांचा सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहीर करणारा सोमेश्वर कारखाना पहिला ठरला आहे.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या सर्वोच्च अंतिम ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी कारखान्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यातील तुटणाऱ्या उसासाठी प्रतिमेट्रिक टन ३ हजार ८०० रुपये, फेब्रुवारीमध्ये ३ हजार ९०० रुपये आणि मार्चमध्ये ४ हजार रुपये असा ऐतिहासिक ऊसदर दिला होता. आता अंतिम ऊसदरही प्रतिटन ४ हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील एफआरपीपेक्षा सोमेश्वर कारखान्याचा ऊसदर प्रतिमेट्रिक टन ५९९ रुपयांनी अधिक ठरला आहे. कारखान्याने यापूर्वीही ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत सर्वोच्च दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

मागील गाळप हंगामात कारखान्याने सुमारे १२ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप केले असून, त्यातून साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. तसेच कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातून अल्कोहोल व इथेनॉलचेही विक्रमी उत्पादन घेण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून कारखान्याच्या संचालक मंडळाने अंतिम ऊसदर निश्चित केला आहे. येत्या गाळप हंगामातही ऊस उत्पादकांना अधिकाधिक फायदा मिळावा, यासाठी कारखान्याने नियोजन केले आहे.

२०२६-२७ गाळप हंगामासाठी फेब्रुवारीत तुटणाऱ्या उसाला १०० रुपये, मार्चमधील उसाला २०० रुपये आणि एप्रिल व त्यानंतर तुटणाऱ्या उसासाठी प्रतिटन ३०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हंगामात हार्वेस्टरद्वारे तुटणाऱ्या उसासाठीही प्रतिटन प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी काटकसरीने, शिस्तीने आणि ध्येयधोरणानुसार कारखाना चालविण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शनाच्या धर्तीवर कारखान्याचे कामकाज सुरू असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनातून निर्माण झालेली सर्वोच्च ऊसदराची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार संचालक मंडळाने व्यक्त केला.

कारखान्याचे सभासद, अधिकारी, कामगार, ऊस तोडणी व वाहतूकदार यांच्या सहकार्यामुळे सोमेश्वरची घोडदौड यशस्वीपणे सुरू असून, भविष्यातही कारखाना सर्वोच्च ऊसदर देण्यासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला. येत्या २०२६-२७ गाळप हंगामात कारखाना कार्यक्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या उसाचे गाळप करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी सोमेश्वर कारखान्यालाच ऊस द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!