कलबुर्गी । न्यूज कट्टा
कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील दगड खाणीत काम करणाऱ्या ४९ वर्षीय मजुराने कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील सासरवाडीत जाऊन कमरेला जिलेटिनच्या कांड्या बांधून स्फोट घडवून आणला. या भीषण घटनेत मजूर आणि त्याच्या १५ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
शिवलाल राठोड असे मृत मजुराचे नाव आहे. तो पुण्यातील एका दगड खाणीत काम करत होता. शिवलाल आणि त्याची पत्नी सविता यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. सततच्या भांडणाला कंटाळून सविता आपल्या १९ वर्षीय मुलगा प्रकाश आणि १५ वर्षीय मुलीला घेऊन कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील मटकी तांडा येथील माहेरी गेली होती. मंगळवारी सकाळी शिवलाल अचानक सासरवाडीत पोहोचला. तेथे त्याचा पत्नी आणि सासरच्या मंडळींसोबत वाद झाला. वाद वाढल्यानंतर शिवलालने घरातील एका खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद करून घेतला.
शिवलालच्या कमरेला स्फोटकांचा बेल्ट असल्याचे समोर आले आहे. घरातील मंडळींना काही समजण्यापूर्वीच त्याने स्फोट घडवून आणला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की परिसर हादरून गेला. यात शिवलालचा जागीच मृत्यू झाला. त्याच्याजवळ असलेली १५ वर्षीय मुलगीही या स्फोटात मृत्युमुखी पडली. या घटनेत शिवलालची पत्नी सविता, मुलगा प्रकाश, नातेवाईक सुरेखा चव्हाण (३०), विवेक चव्हाण (१२) आणि नितेश हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शिवलाल पुण्यातील दगड खाणीत काम करत असल्याने त्याला स्फोटकांची माहिती असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कामाच्या ठिकाणाहून जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर बेकायदेशीररीत्या आणल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





