BIG BREAKING : जेजुरीत वारकऱ्यांवर काळाचा घाला..! ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

जेजुरी | न्यूज कट्टा 

पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी भीषण अपघात घडला. भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांचे सामान वाहून नेणाऱ्या ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिल्याने सहा वारकरी गंभीर जखमी झाले. त्यापैकी उपचारादरम्यान तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्ञानोबा माऊलींची पालखी काल जेजुरी येथे मुक्कामी होती. सासवडचा मुक्काम संपल्यानंतर आज सकाळी वारकरी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. पालखी मार्गावर एका बाजूने वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक, पोलिस आणि प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली असून मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!