जेजुरी | न्यूज कट्टा
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सोमवारी सकाळी सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. जखमींवर सर्वोत्तम उपचार व्हावेत, कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये आणि आवश्यक ती सर्व वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीने पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त आर्थिक मदतही दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्या म्हणाल्या की, जखमी वारकऱ्यांच्या उपचारात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित सर्व यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कठीण प्रसंगी शासन अपघातग्रस्त वारकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा नियमित आढावा घेऊन वारी मार्गावरील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला पूर्वीच देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या भेटीदरम्यान जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप दिलीप बारभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, भावार्थ देखणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




