धक्कादायक : नवी मुंबईत थरारक मर्डर मिस्ट्री; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकले..!

नवी मुंबई | न्यूज कट्टा

महाराष्ट्रात गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणाची चर्चा सुरू असतानाच नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून आणखी एक धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे. ऐरोलीतील एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून तब्बल ११ महिने हा गुन्हा लपवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या कसून चौकशीत अखेर या दुहेरी कटाचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी सुनिता कुशवाह (40) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (30) यांना अटक केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव बलीराम सूर्यनाथ कुशवाह (50) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलीराम कुशवाह हे ऐरोलीतील यादव नगर येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. दरम्यान, त्यांची पत्नी सुनिता हिचे घणसोली येथे राहणाऱ्या रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. या संबंधांची माहिती बलीराम यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला. याच कारणातून पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट सुनिता आणि राहुल यांनी रचल्याचा आरोप आहे.

मुलांना बाहेर पाठवून केली हत्या

हा कट यशस्वी करण्यासाठी सुनिताने आधी दोन्ही मुलांना दोन दिवसांसाठी नातेवाईकांकडे पाठवले. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री बलीराम झोपेत असताना सुनिता आणि राहुल यांनी त्यांचा गळा आवळला. त्यानंतर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी घरातच मृतदेहाचे तीन तुकडे केले. मुंडके, धड आणि पाय वेगवेगळ्या गोण्या व चादरींमध्ये गुंडाळून राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील दाट झाडीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा आरोप आहे.

घर भाड्याने देऊन प्रियकरासोबत राहू लागली

गुन्ह्यानंतर सुनिताने यादव नगरमधील घर भाड्याने दिले आणि मुलांसह राहुलसोबत घणसोली येथे राहण्यास सुरुवात केली. काही महिन्यांनंतर बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने भावाबाबत विचारणा केली. त्यावेळी सुनिताने “भांडण करून घर सोडून गेले” अशी माहिती देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. बलीराम यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांच्या भावाने एप्रिल २०२६ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.

मोबाईल बदलले… पण CDRने उघड केला कट

तपास सुरू झाल्यानंतर आरोपींनी जुने मोबाईल आणि सिमकार्ड बदलून नवे मोबाईल वापरण्यास सुरुवात केली. मात्र कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासात राहुल वेगवेगळ्या क्रमांकांवरून सातत्याने फक्त सुनिताशी संपर्कात असल्याचे आढळले. याशिवाय चौकशीदरम्यान सुनिता पतीबाबत वारंवार वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली. त्यांच्या जबाबातील विसंगती समोर आल्यानंतर कसून चौकशी करण्यात आली आणि दोघांनीही हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

११ महिन्यांनंतर अवशेषांचा शोध

आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी गवळी देव डोंगर परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. मात्र गुन्हा घडून जवळपास ११ महिने उलटल्याने अवशेष शोधणे हे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करत असून, हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!