इंदापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या सोबत राहिलेल्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी आता शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या दुपारी ४ वाजता माने यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. आगामी विधाणसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर माने हे शरद पवार गटात दाखल होत आहेत.
प्रवीण माने यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजितदादांसोबत जाणे पसंत केले. आता विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागल्यानंतर माने हे या निवडणुकीत नशीब आजमावतील अशी चर्चा सुरु झाली होती.
अजितदादांकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनाच पुन्हा संधी दिली जाईल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रवीण माने यांनी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. प्रवीण माने हे इंदापूरमधून विधानसभेचे उमेदवार असतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
इंदापूरमधून शरद पवार गटाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांचीही नावे चर्चेत आहेत. यामध्ये आप्पासाहेब जगदाळे हे पक्ष फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबतच राहिले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांच्या उमेदवारीच्याही चर्चा झडल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय सारीपाटाच्या या खेळात कोण बाजी मारणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.





